Thursday, August 27, 2015

तेंडुलकर, विजय. मसाज. राजहंस प्रकाशन, पुणे २००४. पृष्ठसंख्या ११५

रेटिंगः ७/१०

मसाज हे वेगळंच पुस्तक आहे. ही कादंबरी नाही, लघुकथा नाही. हे एक लांबलचक स्वगत आहे, पण त्याहून महत्वाचं म्हणजे हा प्रेक्षकांशी केलेला संवाद आहे. पुस्तकाच्या शेवटी आपल्याला कळतं की मसाज हा एकपात्री प्रयोग मराठीत निखिल रत्नपारखीने सादर केला होता (दिग्दर्शक: संदेश कुलकर्णी), आणि नंतर त्याचं हिंदी रुपांतर राकेश बेदीने लोकप्रिय केलं. अजून हा प्रयोग बघण्याची संधी आली नाही, पण पुस्तक वाचल्यावर तो बघण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

मसाज हे मधू जोशी नावाच्या एका सामान्य माणसाने स्वतःच्या तोंडी सांगितलेलं आत्मचरित्र आहे. बहुतांशी सामान्य माणसांप्रमाणे सुरुवातीला मोठ्या महत्वाकांक्षा, मग जीवनाशी झुंज देताना त्या हळू हळू बारगळणं, आयुष्यातले चढ उतार - खास करून उतारच, त्यातून शोकांतिकेचा वास. खरं म्हणजे माणूस एवढा सामान्य की शोकांतिका वगैरे शब्दही त्याच्या जीवनासाठी वापरणं चुकीचं. त्यातून मधू जोशी हा सदैव हसणारा माणूस, त्यामुळे प्रेक्षकांना हे कळणं कठीणच. तर हा माणूस आपल्या जीवनातले अनेक किस्से सांगतो, हिरो व्हायची स्वप्नं बघून शेवटी मसाजतज्ज्ञ होतो.

विजय तेंडूलकर किती समर्थ लेखक होते हे ज्यांना माहिती नसेल त्यांना हे पुस्तक वाचून कळेल. दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करून त्याचं आत्मचरित्र लिहिणं/ सांगणं ही अवघड गोष्ट त्यांनी साध्य केली आहे. हे आत्मकथन एवढं वास्तववादी आहे, की खरोखरच असा माणूस अस्तित्वात होता आणि तो तेंडुलकरांना माहित होता ह्याबद्दल शंका नाही. तेंडुलकरांनी त्यांच्या सवयीनुसार नावं खरीच वापरली आहेत (उदा. पंढरी जुकर ), किंवा अशा प्रकारे की वाचणाऱ्याला लगेच लक्षात यावीत. (उदा. स्मिता पाटील).


तात्पर्य: पुस्तकही वाचा, आणि संधी मिळाल्यास त्यावर आधारित नाटकही बघा.  

No comments:

Post a Comment